रामकृष्ण परमहंस हे परमहंसपदाला पोहोचले, असं त्यांच्या शिष्यांना वाटायचं. खुद्द रामकृष्णांना मात्र याची जाणीव होती की त्यांच्यात काहीतरी उणीव आहे, एक टप्पा अजून पार व्हायचाय. अजून आपण 'तिथे' पोहोचलेलो नाही.
त्यांचे शेवटचे गुरू तोतापुरी यांना त्यांनी ही व्यथा सांगितली. बाबा तोतापुरी म्हणाले, तू सगळं सोडलंस पण कालीला सोडलं नाहीस, देवाची आस सुटली नाही, तीही सोड. मग पार जाशील.
रामकृष्ण म्हणाले, पण कशी सोडू? आई आहे ती माझी. तिला कसं सोडू? तुम्ही म्हणता ते बरोबर आहे. पण, मी ध्यानात जातो तेव्हा ती समोर येऊन उभी ठाकते आणि मला चराचराचा विसर पडतो, मी त्यापुढे जाऊच शकत नाही.
तोतापुरी म्हणाले, आता तू ध्यानाला बसलास आणि काली समोर आली की तलवारीने खांडोळी करून टाक तिची.
रामकृष्ण म्हणाले, तलवार कुठून आणू?
तोतापुरी म्हणाले, काली कुठून आणलीस, तिथूनच. कल्पनेतल्या देवीला कल्पनेतल्या तलवारीने नष्ट कर आणि द्वैत संपवून परमात्मस्वरूपात विलीन होऊन जा, असं त्यांना म्हणायचं होतं.
काली दिसली की आपण हरवून जातो आणि आपलं भान हरपतं, असं परमहंसांनी सांगितल्यावर तोतापुरी बाहेर गेले. त्यांनी काचेचा एक तुकडा आणला. म्हणाले, ध्यानाला बस. काली आली की मला कळेलच. मग मी तुझ्या डोक्यावर या काचेने ओरखडेन. तू भानावर ये आणि कालीचे दोन तुकडे करून टाक तलवारीने.
रामकृष्ण ध्यानाला बसले.
त्यांच्या मन:पटलावर काली आली, तेव्हा ते तोतापुरींना कळलं. त्यांनी रामकृष्णांच्या मस्तकावर असा काही ओरखडा काढला की रक्ताची धार लागली. रामकृष्ण आत जागे झाले. त्यांनी कालीची खांडोळी केली आणि असं म्हणतात की जवळपास सहा तास ते निश्चेष्ट अवस्थेत बसून होते… कसलीही हालचाल नव्हती.
डोळे उघडले तेव्हा ते म्हणाले, अखेरची बाधा नष्ट झाली, शेवटची पायरीही पार झाली…
